शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे लोकसभेतील नऊपैकी तब्बल सहा खासदार फुटल्यामुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण आहे. या बंडाचे लोण आता सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटात देखील पोहोचू लागले आहे. विधान परिषद निवडणुकीचा निकाल 22 जून रोजी लागल्यानंतर शरद पवार गटाचे हे आमदार खासदार फुटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार उत्तम जानकर यांनी जाहीर आमचे आमदार फुटलेच तर ते शिंदे सेनेत कशाला जातील त्याऐवजी अजित पवार गटात जातील असं वक्तव्य केल्यामुळे याला दुजोरा मिळाला आहे. शिवाय माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे शिंदे सेनेत जातील अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे जून एंड पर्यंत केंद्रात ज्याप्रमाणे मोठ्या राजकीय घडामोडी पडतील त्याचप्रमाणे राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यात देखील त्याचे मोठे राजकीय पडसाद उमटतील अशी चिन्हे आहेत.










