सोलापूर- वाढदिवसाचा आनंद पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमातून साजरा करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. यावेळी त्यांनी स्वखर्चातून सुमारे दहा फूट उंचीची ६० रोपे विद्यापीठाला भेट दिली. यामध्ये ५८ केशर आंब्याची रोपे, तसेच प्रत्येकी एक वड आणि पिंपळाचे रोप समाविष्ट आहे.

कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. महानवर यांनी विद्यापीठ परिसर हरित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात तब्बल पाच लाख वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प त्यांनी जाहीर केला असून, त्या दिशेने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाबरोबरच विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे एक लाख ६८ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून, त्यांचे संगोपन आणि संवर्धन विद्यापीठामार्फत नियमितपणे केले जात आहे.
पर्यावरण संवर्धनाबाबतची आपली बांधिलकी जपत डॉ. महानवर यांनी गेल्या वर्षीही वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणासाठी २५ हजार रुपयांची मदत विद्यापीठाला दिली होती. यंदाही त्यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त ६० मोठ्या आणि विकसित रोपांची भेट देऊन पर्यावरण संरक्षणाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. वृक्षारोपण कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्तेही परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमानंतर कर्मचारी संघटनांच्या वतीने कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. याच दिवशी वाढदिवस असलेल्या विद्यापीठातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी वाढदिवस, स्मृतिदिन, वर्धापनदिन यांसारखे वैयक्तिक आनंदाचे क्षण वृक्षारोपणासारख्या विधायक उपक्रमातून साजरे करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.










