सोलापूर- खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झालेल्या सोलापूरच्या उभरत्या धावपटू विनीत फ्रॅंकलिन दिनकर यांचा आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विनीतचे आई-वडील उपस्थित होते.
विनीत दिनकर याने नुकत्याच झालेल्या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर व 4×100 मीटर रिले या तीनही प्रकारात सुवर्ण पदक पटकावून घवघवीत यश मिळवले आहे. तसेच ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने पाचवा क्रमांक मिळवला आहे. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याने सोलापूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे.
याप्रसंगी बोलताना जि.प. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार म्हणाले, “विनीतने आपल्या जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. जिल्हा परिषदेच्या वतीने विनीतसारख्या खेळाडूंना सदैव सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”










