सोलापूर, दि. २९ (जिमाका) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत खरीप हंगाम २०२६-२७ साठी शेतकरी गटांकडून पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण या घटकांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
या अभियानांतर्गत तुर, मुग, उडीद, बाजरी, मका व सोयाबीन या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पीक प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार असून प्रमाणित बियाण्यांचे वितरणही करण्यात येणार आहे.
पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना दि. ३१ मार्च २०२४ पूर्वी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे नोंदणीकृत असलेले शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र राहणार आहेत. संबंधित गटाने अधिकृत केलेल्या सदस्यामार्फत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. गटांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्वावर करण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/Agrillogin या संकेतस्थळावरील “प्रात्यक्षिक, औषधे आणि खते” या पर्यायाखाली शेतकरी गटांना अर्ज सादर करता येतील. तसेच बियाणे वितरण घटकासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांनाही अर्ज करता येणार आहेत.
शासनाच्या नियमानुसार अर्जदार व लाभार्थी गटातील सदस्यांकडे Farmer ID असणे बंधनकारक आहे. अधिकाधिक शेतकरी गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
