सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. प्रति मतदार शंभर रुपये एवढा जास्तीत जास्त खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली होती. महापालिकेसाठी 9 लाख 24 हजार 706 एवढी मतदार संख्या होती. म्हणजेच निवडणुकीचा खर्च सव्वानऊ कोटीच्या आत मध्ये होणे अपेक्षित आहे. असे असताना होऊ द्या खर्च…निवडणुकीचे आहे वर्ष असं म्हणत…प्रशासनाने मनमानी पद्धतीने खर्च केला आहे. हा निवडणुकीचा खर्च तब्बल साडेबारा कोटीच्या वर आहे. मंडप खुर्च्या यांचा खर्च… जेवणावळी… सीसीटीव्ही कॅमेरे… निवडणूक भत्ते … निवडणुकीसाठी चार चाकी वाहने यावरती वारेमाप खर्च करण्यात आला आहे. वाहनांचा खर्च तब्बल सव्वा कोटीच्या पुढे आहे. मंडप आणि कार्पेट याचा खर्च ते भाड्याने घेणे ऐवजी नवीन घेतले असते तरी परवडले असते एवढा प्रचंड आहे. तसाच खर्च सीसीटीव्ही च्या बाबतीत असून तो 50 ते 60 लाख आहे यामध्ये भाड्याने घेण्याऐवजी खरेदी करून नवीन सीसीटीव्ही महापालिकेला मिळाले असते. 7000 निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये भत्त्याचा खर्च आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच त्यांच्यासाठी नेमलेले कनिष्ठ अधिकारी यांनी या खर्चावर काहीच लक्ष दिले नाही का असा संशय निर्माण झाला असून आता या प्रकरणाकडे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे डोळसपणे पाहू लागले आहेत. यातून खूप मोठा गैरव्यवहार बाहेर येणार आहे.

