सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचू लागला आहे. भाजपने 102 उमेदवार उभे केले असून त्यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेनेने युती केली आहे. तर महाविकास आघाडी देखील ताकतीने लढत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी सोलापुरात येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सात रस्ता लष्कर येथील जगदंबा चौकापर्यंत रोड शो करणार होते. जगदंबा चौकात तेच जाहीर सभा घेणार होते मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे शिवसैनिकांना त्यांच्या पुढच्या तारखेची उत्सुकता आहे. इकडे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात ठाण मांडून बसले असून उद्या हरिभाई देवकरण प्रशालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. बहुतांश प्रभागात तुल्यबळ अशा लढती होणार असल्यामुळे सर्वच उमेदवारांनी आणि सर्वच पक्षांनी जोरदार ताकद लावली आहे. भाजप कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना उद्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची, सभेची आणि भाषणाची उत्सुकता लागली आहे.










