यंदाच्या महापालिका निवडणुकीत राज्यभर भाजप इतर पक्षातील कार्यकर्त्यांना फोडाफोडी करून पॉवरफूल दिसत आहे. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार असलं तरीही भाजपने महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या एनसीपीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बाजूला ठेवले आहे. सोलापुरात देखील तशीच परिस्थिती राहण्याची चिन्हे आहेत. इकडे भाजपच्या मुलाखती सुरू झाल्या तरीही काँग्रेसभवनात मात्र शुकशुकाट आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे खासदार प्रणिती शिंदे 22 आणि 23 डिसेंबर रोजी सोलापुरात येत असून निरीक्षक मोहन जोशी यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील. राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून मुलाखती सुरू झाले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुती तसेच तिकीट वाटपाचा निर्णय आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे या तीनही आमदारांवर सोपविला आहे.
जवळपास 80 टक्के तिकीट फिक्स करण्यात झाल्याचे कळते.त्या त्या विधानसभा मतदार संघात येणाऱ्या प्रभागामधील तिकीट वाटप आमदारांच्याच हातात आहेत. आता केवळ मुलाखतीचा फार्स भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे आमदारांच्या विरोधात जाणाऱ्यांना तिकीट मिळणे सध्या तरी मुश्किल दिसत आहे. 2017 सालच्या निवडणुकीत 49 नगरसेवक विजय झालेल्या भाजपने यंदाच्या वेळेस स्वबळावर 75 नगरसेवक विजयी करण्याचा संकल्प सोडला आहे. गत निवडणुकीत 14 नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसची अवस्था बिकट आहे. 21 नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेचे आता दोन तुकडे झाले असून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट किती जागा जिंकेल याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे देखील दोन तुकडे झाले असून अवघ्या चार जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणि शरद पवार गटाला किती जागा मिळतील याचे देखील मोठे कोडे आहे. पाठीमागच्या निवडणुकीच्या वेळेस बसपाने आणि माकपणे प्रत्येकी एक तर एम आय एम ने नऊ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या वेळी एमआयएमच्या जागा वाढतील असा अंदाज आहे. एकीकडे भाजप स्वबळावर सुसाट वेगाने पुढे जात असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे त्रांगडे कायम आहे. रविवारी महाविकास आघाडीचा निर्णय होणार आहे. तर एम आय एम ने एकला चलो रे चा नारा दिला आहे.

