सोलापूर : घर बांधताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळं स्वप्न असतं. त्या स्वप्नाला आकार देत घराचं बांधकाम करणं हे स्वप्नपूर्ती असते. जमिनीवर वाडा बांधता येतो पण इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावरील घराला ग्रामीण ढंगात सजवणे, जुन्या वाड्याच रुप देणे, शिवकालीन दरवाजे अन् खिडक्या बनवून घेणे ही सोपी गोष्ट नाही. चित्रकार सचिन खरात यांनी हे साध्य करुन दाखविले, असे प्रतिपादन प्रख्यात सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रकार सचिन खरात यांच्या ‘चित्रस्पर्श’ या कलादालनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, आर्किटेक सिमंतिनी चाफळकर, सचिन खरात यांचे कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. चित्रस्पर्श या कलादालनामध्ये दाराच्या उंबऱ्याबाहेर काळ्या पाषाणात घडवलेले कासव, शिवकालीन दारे, पेशवेकालीन खिडक्या, मोठा झोपाळा, सूक्ष्म कलाकुसरीने नटलेला सोपा आणि खुर्च्छा, भिंतीवर रोमन आकड्यांचे घड्याळ, शेणाने सारवलेल्या भिंती, छतावर अजंठा वेरुळ येथील लेणींची जुनी चित्रे अशा पध्दतीने ऐतिहासिक वास्तू वाटेल अशी रचना करण्यात आली.