अहमदनगर : गुजरातमधील सर्व शाळांमध्ये महाकाव्य भगवद्गीता हे अनिवार्य करण्यात आलं आहे. गुजरातचे शिक्षण मंत्री जीतू वघानी यांनी हा निर्णय घेतला आहे. “इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवली जाईल,” असं जीतू वघानी म्हणाले.
भारतीय संस्कृती आणि ज्ञान प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांमध्ये भगवद्गीतेतील मूल्ये आणि तत्त्वांची आवड निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे. अभ्यासक्रमाबरोबरच प्रार्थना इत्यादी कार्यक्रमांमध्ये गीतेचाही समावेश केला जाणार आहे. गुजरातमधील शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून भगवद्गीतेचा अभ्यासक्रमात समावेश होईल असं म्हटलं जात आहे.
नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत निर्णय
नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत काही मूलभूत तत्त्वे करण्यात आली आहेत. यापैकी एक तत्त्व म्हणजे विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण, प्राचीन आणि आधुनिक संस्कृती आणि ज्ञान प्रणाली तसेच परंपरांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे. अशा परिस्थितीत भारतीय संस्कृतीची माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

