येस न्युज नेटवर्क : कोरोना व्हायरसचं प्रमाण कमी झाल्यानं महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. 17 आणि 18 तारखेला होळी, धुलिवंदनचा सण साजरा केला जाणार आहे. होळी, धुळवडवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत तसेच नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या परिपत्रकामुळे होळी साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गृहखात्याकडून मार्गदर्शक सुचना व नवी नियमावली
- कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणुक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.
- एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी
- होळी,शिमगा निमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.
- कोवीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानागरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे
- मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं
होळीच्या सणाची सर्वत्र लगबग सुरु आहे. कोरोनाचे निर्बंध कमी झाले असून होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली घोषित केली आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्यानं मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. आज, उद्या, 17 तारखेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. मात्र, या होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे.

