सोलापूर : येथील होटगी रोड परिसरात असणार्या एका हॉटेलवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून त्याठिकाणी सुरु असलेला जुगार अड्डा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह 29 जणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील कारवाईचे कामकाज विजापूर नाका पोलीस ठाण्यात सुरु होते.
होटगी रोडवर विमानतळा शेजारी माजी आमदार रविकांत पाटील यांच्या मालकीचे हॉटेल आहे. त्याठिकाणी जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंखे व सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाडीक यांच्या पथकाने रात्री 10 च्या सुमारास त्या हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये पत्त्यांचा जुगार सुरु असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी हॉटेल मालक रविकांत पाटील यांच्यासह जुगार खेळणार्या तब्बल 29 जणांना ताब्यात घेतले. यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर रविकांत पाटील यांच्यासह सर्वच जुगार्यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणले गेले. त्याठिकाणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. रविकांत पाटील यांना ताब्यात घेतल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गर्दी केली.