सोलापूर दि. १७:- रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाचे काम प्रगती पथावर असून प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी पायाभूत व मुलभूत सुविधा यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाणी, पावसाळी गटार, ड्रेनेज आणि लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बॅंकांमार्फत वार्षिक दरसाल दरशेकडा ६.५ टक्के व्याज दराने कर्जाची उपलब्धता या प्रमुख अडचणी लक्षात घेऊन यावर तातडीने सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान कार्यालय व पंतप्रधान आवास योजना अभियान संचालक तथा उपसचिव मंगेश घिडियाल यांनी दिले.
आशिया खंड आणि संबंध जगात श्रमिक कष्टकरी असंघटीत ३० हजार कामगारांचे ३०० एकर माळरानावर परवडणाऱ्या दरात आणि सर्वांसाठी घरे हि केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना सहकार तत्वावर रे नगर फेडरेशनच्या मार्फत ३० हजार घरकुलांची उभारणी केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान आणि लाभार्थ्यांचा हिस्सा अशा स्वरूपात करण्यात येत आहे. यासाठी पक्क्या घरकुलासोबत पायाभूत व मुलभूत सुविधा आदींची अनिवार्यता आहे. यासोबत घरकुलाची उभारणी होऊन प्रत्यक्ष वसाहतीत लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी लागणाऱ्या सुविधाही आवश्यकता आहे. या सगळ्या बाबी वेळोवेळी केंद्र व राज्य सरकार आणि गृहनिर्माण मंत्रालयासमोर अद्यावत माहितीची पूर्तता केल्यामुळे फेडरेशनवर विश्वास ठेवून प्रकल्पाची सत्यता पडताळून आजरोजी पंतप्रधान कार्यालय मार्फत पंतप्रधान आवास योजना अभियानाचे मा. संचालक, उपसचिव तसेच म्हाडाचे पदाधिकारी व सक्षम अधिकारी प्रकल्पाच्या पाहणीसाठी आलेले आहेत. प्रकल्पाच्या अडचणीची माहिती घेऊन त्यावर योग्य ती उपाय योजना करण्याची हमी रे नगर फेडरेशनला मिळालेली आहे. असे मत रे नगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी प्रकलाची माहिती देताना नमूद केले आहे की, 9 ऑगस्ट 2022 मध्ये 10 हजार घरकुल, 1 मे 2023 रोजी 10 हजार घरकुल, 2 ऑक्टोबर 2023 रोजी 10 हजार घरकुल असे एकूण 30 हजार घरकुलांचे हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम केंद्र सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे.यासाठी या घरकुलांसाठी केंद्र कडून दीड लाख,राज्य सरकार कडून 1 लाख, लाभार्थ्यांकडून अडीच लाख असे एकूण 5 लाख रुपयांचे घरकुल उभारणी खर्च येणार आहे.या शिवाय 25 हजार अतिरिक्त वाढीव खर्च लाभार्थ्यांवर पडणार आहे. वास्तविक पाहता कोरोना विषाणू च्या महामारी मुळे श्रमिक कष्टकरी व कामगार रोजगारापासून वंचित राहिले. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट व दयनीय आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय मंजुरी व सनियंत्रण समितीची नई दिल्ली येथे 22 फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली.त्या बैठकीत लाभार्थ्यांना भोपाळ च्या धर्तीवर राष्ट्रीयकृत बँकातून साडेसहा टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासंबंधी राज्य सरकार कडे शिफारस पाठवण्यात आले.यामुळे साधारणतः एका लाभार्थ्यांचे 2 लाख 40 हजार रुपये असे 30 हजार असंघटीत कामगारांचे 7 शे 40 कोटींची बचत होण्यास मदत होणार आहे. लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन बँकमार्फत हप्ते ठरवून दिले जातील तसेच लाभार्थ्यांकडून कर्जाची नियमित वसुली न झाल्यास थकीत कर्जदारांच्या सुरक्षेसाठी बँकेकडे टप्याटप्याने दोन-दोन कोटींची मुदत ठेव ठेवणार असून 30 हजार घरांचे बँकेकडे तारण ठेवण्यात यावे किंवा हुडको मार्फत वार्षिक दरसाल दरशेकडा साडेसहा टक्के व्याजदराने गृहकर्ज देण्यात यावे. त्यासाठी घरकुल तारण देण्यास तयार आहोत अधिक जोखीम पत्करून जास्तीत जास्त परतावा देणारा निधी तर्फे या गृहकर्जास हमी देण्यात यावी.
सदर रे नगर गृहनिर्माण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भारत सरकार पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे जातीने लक्ष असून दर तीन महिन्याला एकदा केंद्रीय पथकाकडून पाहणी, प्रत्यक्ष प्रगती आणि कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना तातडीने राष्ट्रीयकृत बँकामार्फत कर्जाची उपलब्धता करून देण्याची उपयुक्त सूचना पंतप्रधान आवास योजना अभियान अधिकारी यांनी वेळी झालेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान प्रकल्पाचे सादरीकरण करताना २६ राष्ट्रीयकृत बँका व वित्तीय संस्थांचे ९५ अधिकारी यांच्या समक्ष दिले. याची पूर्ण जबाबदारी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर असून त्यांनी तशा पद्धतीने पाठपुरावा करावा असेही सांगण्यात आले. याकरिता राष्ट्रीयकृत बँका, केंद्रीय गृहनिर्माण मंडळ, म्हाडा आणि रे नगर फेडरेशन यांचे समन्वय साधण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली.
रे नगर ला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अनेक बैठका पार पडले. सोलापूर च्या एन.टी.पी.सी.साठी दररोज 144 एम.एल.डी.इतका वापर होतो. त्यांना मिळणाऱ्या एकूण पाण्याच्या पुरवठ्यातून पाणी 30 एम.एल.डी. पाणी होटगी वरून रे नगर ला द्यावे.
सांडपाणी बाबत 5 मार्च 20 रोजी भारत सरकार ऊर्जा मंत्रालायकडून परिपत्रक काढण्यात आले. याचा आधार घेऊन पाण्याची उपलब्धता करून द्यावे. महानगरपालिके कडून 110 एम.एल.डी.पाणी मिळवण्याचे नियोजन असून जलवाहिनी पाकणी ते सोरेगाव पर्यंत आलेली आहे.सध्या रे नगर साठी 30 एम.एल.डी.पाणी सोलापूर महानगरपालिका मार्फत स्वतंत्र जलवाहिनी पाकणी ते रे नगर कुंभारी पर्यंत टाकून पाणीपुरवठा करण्याची प्रस्ताव वजा विनंती रे नगर फेडरेशन मार्फत करण्यात आली असून त्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात येते.
शनिवार दिनांक 17 जुलै रोजी पंतप्रधान आवास योजना अभियान संचालक तथा उपसचिव मंगेश घिडियाल, महाराष्ट्र राज्य सरकार चे एस.के.बब्बर, गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय चे क्षेत्रीय समन्वयक अखिलेश केरके, गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय प्रकल्प व्यवस्थापन समिती सदस्या श्रीमती सिरीशा, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास व प्राधिकरणाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, मुंबईचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुगळीकर, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, संबंधित केंद्र व राज्य सरकारचे सक्षम अधिकारी रे नगर च्या प्रकल्पाची पाहणी केली.
यावेळी फेडरेशन च्यावतीने कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते सोलापुरी चादर, श्री.विठ्ठल रखुमाई मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
तद्नंतर म्हाडाचे उपाध्यक्ष मा. अनिल डिग्गीकर यांनी देशातील सर्वात मोठे गृह प्रकल्प म्हणून रे नगर गृह प्रकल्प ओळखले जात असून या प्रकल्पासाठी म्हाडा मार्फत सर्वतोपरी सहकार्य आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणार असल्याची ग्वाही दिले.
त्यानंतर एक.के.बब्बर यांनी जे लाभार्थ्यांचे दुखः आहे ते आमचे दुखः आहे. हे दुखः निवारण करण्यासाठी अर्थातच स्वतःच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना कार्यालयाकडून निधीची उपलब्धता आणि जलदगतीने पाठपुरावा करण्याची हमी देण्यात आली. यानंतर तब्बल दोन तास रे नगर गृह प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व्यासपीठावर रे नगर फेडरेशन अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, सचिव युसूफ शेख (मेजर), सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख, नगरसेविका कामीनी आडम, गजेंद्र दंडी आदी उपस्थित होते.










