17 हजार 847 कुटुंबात झाली योगसाधना
सोलापूर, दि. 28 जून : जागतिक योग दिनानिमित्त कुटुंब प्रबोधन गतीविधी पश्चिम महाराष्ट्र प्रांत सोलापूर शाखा आणि समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संस्थांच्या सहकार्याने 21 ते 27 जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या योग सप्ताहाची रविवारी सकाळी सोरेगाव येथील एस.आर.पी. कॅम्पच्या मैदानावर सांगता झाली.
हा कार्यक्रम राज्य राखीव दलाचे समादेश रा.बा.केंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी, पतंजली योगपीठाच्या वरिष्ठ राज्य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे, पर्यावरण गतिविधीचे सुनिल इंगळे, सुमेध फाऊंडेशनच्या माखिजा राजपूत साहेब, टिंगरे, कुंभार यांच्या उपस्थितीत झाला. समारोपा नंतर प्रिशा फाऊंडेशनच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम व महिलासाठी ओपन जीमचे उदघाटन नगरसेवक शिवा कांबळे व नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
21 जून ते 27 जून कॅंम्पच्या परेड ग्राऊंडवर सात दिवस दररोज 120 जवान आणि महिलांकडून योगसाधना करून घेतली गेली. महिलांसाठी म्युझिकल ट्रॅंक ग्राऊंडवर योगसाधना केली गेली. पतंजली योगसमितीचे योगशिक्षक श्रीनिवास बावदनकर, योगशिक्षिका खाडे, सुतार, शेळके, मड्डेपल्ली यांचे मार्गदर्शन लाभले.
या सप्ताहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह आणि सहकार्याने सर्व 168 महाविद्यालयात योगसप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास आठ हजार विद्यार्थी व कुटुंबापर्यंत पोहचून योगसाधना केली गेली. नेहरू युवाकेंद्रातर्फे सोलापूर जिल्ह्यातील 250 तालुका समन्वयक यांच्या माध्यमातून तालुक्यात योगसाधना केली गेली. लोकमंगल को-आँप.बॅंक व लोकमंगल सहकारी पतसंस्थाचे 223 अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून प्रत्येकी 25 कुटुंब जोडून त्यांच्याकडून योगसप्ताहात योगसाधना करून घेतली गेली. योग असोसिएशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी अनेक कुटुंबातून योगसाधना करून घेतली. सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे अधिकारी कर्मचारी, रोटरी क्लब व लायन्स क्लब सदस्यांच्या सहकार्याने योगसप्ताह संपन्न केला. अशा सर्वांच्या सहकार्याने 5 तालूके व शहर मिळून जवळपास 17,847 कुटुंबापर्यंत पोहचून योगसप्ताह साजरा करण्यात आला. याशिवाय भारतीय जनता पक्ष उत्तर, मध्य विधान सभा क्षेत्र,पुर्व-पश्चिम बुथ कार्यकर्त्यांनीही कुटुंबांशी संपर्क साधून योगसाधना करून घेतली. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन कुटुंब प्रबोधन गतिविधीचे जिल्हा संयोजक देवानंद चिलवंत आणि योगसप्ताह प्रमुख ऍड. अमोल देशपांडे यांनी केले होते.