येस न्युज मराठी नेटवर्क : पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावच्या प्रथम नागरिक सरपंच पदाचा मान अनुसूचित जमाती प्रवर्गातील शशिकला दिलीप चव्हाण या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार बनवणाऱ्या गरीब पारधी समाजाच्या महिलेला मिळाला आहे.सरपंचपदाची घोषणा 27 फेब्रुवारी रोजी झाली. परंतु पोलिस बंदोबस्त मोठा असल्याने त्यांचे उत्साहात स्वागत करता आले नाही. परंतु पारधी समाजातील त्यांच्या नातेवाईकांनी आणि समाज बांधवांनी त्यांच्याच भाषेत ‘अपनी शशी सरपंच हवी’ असे सांगत सर्वांपर्यंत निरोप पोहोचवला आणि दिवसभर त्यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी आणि तोंड गोड करण्यासाठी समाज बांधवांची रीघ लागली होती . गावोगावी भटकत राहणाऱ्या आमच्या पारधी समाजाला सरपंचपद मिळणे ही मोठी गोष्ट आहे. आता गावकऱ्यांची सेवा करायला मिळणार असल्याने मला आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया रोपळे बुद्रुक शाळा नूतन सरपंच शशिकला चव्हाण यांनी दिली आहे.