सोलापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्र (DEIC), जिल्हा रुग्णालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या १९ बालकांना विशेष बसद्वारे बालाजी रुग्णालय, मुंबई येथे आज दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी उपचारासाठी रवाना करण्यात आले.या विशेष बसला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी हिरवा झेंडा दाखवून बालकांना मुंबईकडे रवाना केले.

१९ बालकांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील हृदयरोग असलेल्या व शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांची तपासणी करून त्यांची उपचारासाठी निवड करण्यात आली आहे.शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना शिबिराच्या पंधरा दिवस अगोदर पूर्वसूचना देण्यात आली. तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली असून, मुंबई येथे होणाऱ्या मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराबाबत पालकांचे समुपदेशन करण्यात आले.या उपचारासाठी प्रत्येक बालकासोबत दोन पालकांना पाठविण्यात आले असून, एकूण १९ बालकांना विशेष बसद्वारे मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बससोबत वैद्यकीय पथकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवास, निवास व भोजनाची सुविधा पूर्णपणे मोफत
बालक व त्यांच्या पालकांसाठी मुंबई येथील उपचारादरम्यान ये-जा करण्याचा प्रवास, निवास, नाश्ता, भोजन तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बालकांना कोणताही आर्थिक भार न पडता आवश्यक हृदय शस्त्रक्रियेची सुविधा मिळणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, मा. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, मा. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. इरफान सय्यद, मेट्रन विजयमाला बेले तसेच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत २,००३ हृदय शस्त्रक्रिया; विविध आजारांच्या ११,८६० शस्त्रक्रिया मोफत
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात बालकांच्या आरोग्याचे संवर्धन व विकास साधण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
आजपर्यंत जिल्ह्यात २,००३ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांसाठी ११,८६० शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश बालकांचा संबंध गरीब व कष्टकरी कुटुंबांशी असल्याचे निदर्शनास आले आहे.ज्या शस्त्रक्रियांसाठी साधारणतः रु. १०,००० ते रु. ८,००,००० पर्यंत खर्च अपेक्षित असतो, अशा शस्त्रक्रिया पात्र बाल लाभार्थ्यांसाठी मोफत करण्यात आल्या आहेत.
याशिवाय किरकोळ आजार असलेल्या असंख्य बालकांना तपासणीच्या ठिकाणीच आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आजारांचे वेळेवर निदान व उपचार होऊन संभाव्य आरोग्यविषयक गुंतागुंत आणि धोके टाळण्यास मदत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.
बालकांच्या निरोगी भविष्यासाठी आरोग्य विभागाचा सेवासंकल्प
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लवकर निदान, वेळेवर उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया उपलब्ध करून देत बालकांना निरोगी जीवनाची संधी देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.सेवा संकल्प अभियानांतर्गत १९ बालकांना हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना करण्यात आल्याने त्यांच्या निरोगी भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
सेवा संकल्प अभियान
“बाल आरोग्याची काळजी — निरोगी भविष्याची हमी!”











