महिलांचा सन्मान वाढला पाहिजे – दीपाली काळे

0
17

सोलापूर – महिलांना म्हणजेच गृहिणींना हाऊस वाईफ म्हणणे चुकीचे तर आहेच पण ते त्यांचा अवमान करणारे आहे. तेव्हा तिची प्रतिष्ठा अबाधित राहील असे हाऊसवूमन सारखे अभिधान तिला गेले पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे असे मत सोलापूरच्या पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांनी शनिवारी सोलापुरात बोलताना व्यक्त केले. सोलापूर सोशल फाऊंडेशन आणि महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्य गौरव सन्मान सोहळ्यात दीपाली काळे या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.

या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातल्या आठ कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. मानपत्र, साडी चोळी, शाल असे सन्मानाचे स्वरूप होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार सुभाष देशमुख यांनी भूषविले होते. तर व्यासपीठावर पतंजलीच्या वरिष्ठ महिला राज्य प्रभारी सुधा अळ्ळीमोरे आणि सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या संचालिका मयुरी वाघमारे-शिवगुंडे या उपस्थित होत्या.या समारंभात अलका काकडे, डॉ. नंदा शिवगुंडे, सुलोचना भाकरे, राजश्री बरबडे, डॉ. पद्मा देशपांडे, सीमंतिनी चाफळकर, मनिषा सीता आणि उर्मिला आगरकर यांना सन्मानित करण्यात आले.

आमदार सुभाष देशमुख आणि शमा पवार यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले. मयुरी वाघमारे-शिवगुंडे तसेच सुधा अळ्ळीमोरे, संगीता जाधव यांनीही आपले विचार मांडले. अलका काकडे, सीमंतिनी चाफळकर, उर्मिला आगरकर यांनी सत्काराला उत्तर देणारे भाषण केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महिला मुक्तीचा संदेश देणारे नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . ऐश्वर्या हिबारे यांनी केले. सन्मानार्थी महिलांचा परिचय अरविंद जोशी यांनी करून दिला तर सुजाता शास्त्री यांनी आभार मानले.