मणिपूर घटनेच्या निषेधार्थ पावसातही महिला-युवा आघाडीचे जोरदार आंदोलन

0
32

मणिपूरमधील अमानुष घटनांचा जाहीर निषेध दिन

सोलापूर दि.२५:- गेले तीन महिने मणिपूर जळत आहे. तेथे मेईती आणि कुकी या दोन जमातीमधील घोर हिंसाचारात शंभरहून अधिक लोक ठार झाले असून पन्नास हजारहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. राज्यातील जनजीवन पूर्णतः उध्वस्त झाले आहे.महिलांवर किती रानटी अत्याचार होत आहेत हे दोन कुकी महिलांच्या मान खाली घालायला लावणाऱ्या व्हिडिओतून जगासमोर आले आहे. याचे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्याक्षा नसीमा शेख यांनी तीव्र शब्दात निर्भत्सना केली.

जनवादी व वर्गीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै २०२३ रोजी राज्यभर मणिपूरच्या अमानवी घटनेच्या निषेधार्थ :निषेध दिन” पाळण्याचा निर्धार केला असून त्या अनुषंगाने सोलापूर येथील पूनम गेट येथे महिला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेविका शेवंता देशमुख व डी.वाय.एफ.आय. चे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शेने करण्यात आली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मा. शमा पवार यांना सिटू, अ.भा.जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, स्टुडट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात नसीमा शेख, सिटू चे राज्य उपाध्यक्ष माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, लिंगव्वा सोलापुरे, विक्रम कलबुर्गी, अँड. अनिल वासम, दत्ता चव्हाण, मल्लेशम कारमपुरी, शाम आडम आदींचा समावेश होता.

यावेळी सिटूचे राज्य सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) म्हणाले कि, या सर्व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांना मणिपूर आणि केंद्रातील भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार जबाबदार आहे. भाजप करत असलेल्या मैतेई या बहुसंख्याक जमातीचे तुष्टीकरण हेच या हिंसाचारामागील प्रमुख कारण आहे.
मणिपूरमधील प्रशासन पूर्णतः कोलमडले असून आपण राज्य करण्यास लायक नसल्याचे भाजपने पुन्हा सिद्ध केले आहे. विद्वेषाची आग शेजारच्या राज्यांतही पसरू लागली आहे. पंतप्रधानांनी अडीच महिन्यांनंतर तोंड उघडले, तेही राजकीय स्वार्थ साधण्यासाठी. स्वतः मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी राज्यभर महिलांवर अत्याचार होत असल्याची कबुली दिली आहे. तथापि, ते त्याची जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत.
यासाठी बिरेन सिंग यांची मुख्यमंत्रीपदावरून ताबडतोब हकालपट्टी करण्याची मागणी करत आहे. तसेच, या द्वेषमूलक, महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्या, राजकीय स्वार्थासाठी बहुसंख्याकांचे तुष्टीकरण करत राज्याराज्याला आग लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा निषेध करत आहे.

यावेळी सुनंदा सूर्यवंशी ,रासुला शेख, शहनाज शेख, शबाना शेख, निलोफर शेख, अशोक बल्ला, किशोर झेंडेकर, प्रभाकर गेंटयाल, अप्पाशा चांगले, अकिल शेख, असिफ पठाण, इलियास सिद्धिकी, अफसाना बेग, लता तुळजापूरकर आदींनी परिश्रम घेतले.
या आंदोलनाचे सूत्रसंचालन दत्ता चव्हाण यांनी तर आभारप्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.