सोलापूर : सोलापूरजवळ बुधवारी सकाळी एका गोडेतेलाच्या टँकरचा अपघात झाला. अपघातानंतर टँकर पटली झाला अन् गोडेतेल रस्त्यावर वाहू लागलं. अपघातग्रस्त ठिकाणापासून जवळच्या गावात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. गोडेतेल पळवण्यासाठी घागर आणि कळशी घेऊन लोकांनी धाव घेतली. अपघातग्रस्त ठिकाणी तेलासाठी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. नागरिकांनी घागर, कळशी अन् मिळेल त्या भांड्यामध्ये गोडेतेल लंपास केलं. गोडतेल घेऊन जाण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील सांगवी गावानजीक गोडेतेलाच्या टँकरचा बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अपघात झालाय. टँकरचा टायर फुटल्याने टँकर विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला अन् ही दुर्घटना घडली. टँकर पलटी होताच टँकरमधून गोडे तेलाच्या धारा लागल्या. गोडेतेल घेऊन जाण्यासाठी घागरी, डबे आणि मिळेल ते साहित्य घेऊन लोकांनी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. मात्र पोलीस प्रशासनाने येऊन लोकांना पांगावले. महागाईच्या जमान्यात लोकांनी भरभरून तेल नेहले.