सोलापूरची बंद पडलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर या दोघांचीही नुकतीच चर्चा झाली आहे. केंद्राच्या उडान योजनेतून आता सोलापूर- मुंबई ही विमानसेवा सुरू होईल त्यामुळे ती किमान पाच वर्ष बंद पडणार नाही असा विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी येस न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केला. मुरलीधर मोहोळ हे सोलापूरच्या विमान सेवे संदर्भात खूप आग्रही आहे. केंद्राच्या उडान योजनेअंतर्गत सोलापूर- मुंबई -सोलापूर आणि अमरावती- पुणे -अमरावती या महाराष्ट्रातील दोन हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर विमानतळ हे केंद्राच्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया च्या ताब्यात आहे. यापूर्वी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून टेंडर काढून व्हायब्रिटी गॅप फंडिंग चे अनुदान देऊन स्टार एअर आणि fly 91 या विमान कंपनीची सेवा अनुक्रमे सोलापूर- मुंबई आणि सोलापूर -गोवा सुरू झाली होती. आता थेट केंद्र सरकारच्या हवाई मंत्रालयाच्या माध्यमातून विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात विमान कंपन्यांसाठी टेंडर काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत अनुदान देऊन ही सोलापूर -मुंबई आणि अमरावती पुणे या विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे ती नियमितपणे चालेल असा विश्वास आहे. या निर्णयामुळे सोलापूर तसेच अमरावती येथील उद्योग -व्यापार- व्यवसायाला चांगली गती मिळेल.







