सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्यावर कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप

0
21

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

  • सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्यावर कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्याच्या विधानसभेत भाजप आमदार राम सातपुते यांनी लक्षवेधी मांडत हा आरोप केलाय. ऑनलाईन पेपर तपासणी तसेच राज्य क्रिडा स्पर्धेत हा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार राम सातपुते यांनी केला. आमदारांच्या आरोपानंतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत कुलगुरुंची चौकशी केली जाईल असे आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
  • कोविडच्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा पद्धती अवलंबण्यात आली होती. या परीक्षेत उत्तरपत्रिका तपसाण्यासाठी कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते. राज्यातील अनेक विद्यापीठात 8 ते 12 रुपये प्रति पेपर तपासणीचा हा दर होता. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने 35 रुपये प्रमाणे हा कंत्राट मंजूर केला. तसेच राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा झाली त्यात देखील भ्रष्टाचार झाला. तसेच विद्यापीठाच्या कॅन्टीनच्या कंत्राटमध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी सभागृहात केला. तसेच कुलगुरु मृणालिनी फडणवीस अधिकारांचा गैरवापर करत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
  • आमदार राम सातपुते यांनी मांडलेल्या या लक्षवेधीनंतर उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ चौकशी समितीची घोषणा केली. आमदार सातपुते यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर विद्यापीठाने खुलासा केला आहे. मात्र या खुलास्यानंतर देखील सदस्यांचे समाधान न झाल्याने राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांची चौकशी केली जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांनी सभागृहात दिली.
  • “राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. कुलगुरु फडणवीस ह्या 5 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्या आधी 30 एप्रिलपर्य़ंत या समितीचा अहवाल येईल. जर अहवाल नकारात्मक आला तर सेवानिवृत्तीनंतरचे लाभ दिले जाणार नाहीत.” अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांनी सभागृहात केली.
  • “तीन दिवसापुर्वी अभाविपचे कार्यकर्ते आंदोलन करत असताना कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्या सांगण्यावरुन मारहाण करण्यात आली. ह्या सगळ्या प्रकारानंतर आमदार राम सातपुते यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित केला. तसेच मागील पाच वर्षात कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्या भ्रष्टाचार संदर्भात लक्षवेधी मांडली. त्याचे आम्ही स्वागत करतो. पण जो पर्यंत कुलगुरुंची चौकशी होऊन समिती आपला अहवाल सादर करत नाही तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे. तसेच त्यांची चौकशी सुरु असताना शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरु मृणालिनी फडणवीस हे ज्या कार्यक्रमात असतील त्या कार्यक्रमात हजेरी लावू नये. जर असं झालं तर अभाविप याचा निषेध करेल. सोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा देखील अडवण्यात येईल.” असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री रोहित राऊत यांनी दिली. दरम्यान 19 मार्च रोजी जुन्नर येथे पुरातत्वीय वस्तुसंग्रहाल आणि माहिती केंद्राचे उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांच्या हस्ते पार प़डणार आहे. या कार्य़क्रमाला कुलगुरु मृणालिनी फडणवीस ह्या देखील प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. अभाविपने दिलेल्या या इशारानंतर काय होतं हे पाहणे महत्वाचे आहे.