“चलो एक कदम मानवता की ओर” उपक्रमांतर्गत ब्लँकेट व चादर व अल्पोपहार चे वाटप
नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात नव्हे तर सेवाभावातून करण्याची सामाजिक बांधिलकी साकव फाउंडेशनने यंदाही जपली. चलो एक कदम मानवता की ओर या उपक्रमांतर्गत ३१ डिसेंबरच्या रात्री रस्त्यावर राहणाऱ्या गरजू व बेघर नागरिकांसाठी ब्लँकेट व चादरींचे वाटप करण्यात आले.शहरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना, साकव फाउंडेशनचे स्वयंसेवक थंडीने कुडकुडणाऱ्या हातांना ऊब देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या उपक्रमाचा उद्देश केवळ वस्तू वाटपापुरता मर्यादित नसून, समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत “तुम्ही एकटे नाही” हा विश्वास पोहोचवण्याचा होता.थंडीच्या दिवसांत ऊब देणे म्हणजे देवळात दिवा लावण्याइतकंच पवित्र कार्य असून, अशा सेवाभावी उपक्रमांतूनच समाजात माणुसकीची भावना अधिक बळकट होत असल्याचे यावेळी साकवचे संस्थापक अध्यक्ष डॉ जगदीश पाटील यांनी नमूद केले.
या सेवाकार्यात प्रशांत होनपारखे, बाबू शेख, अॅड. अकील गफूर हिमोने, मरिस्वामी जगळे, संतोष जाधव यांची उपस्थिती होती. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम शांततेत आणि यशस्वीरीत्या पार पडला.नवीन वर्षातही मानवतेची ही वाट अधिक व्यापक व्हावी, गरजूंपर्यंत मायेची ऊब पोहोचत राहावी, अशी अपेक्षा साकव फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

