येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर लिमिटेड कारखान्याने गळीत हंगाम २०२५–२६ साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कारखान्याकडे गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला प्रति मेट्रिक टन ३,००० रुपये दर देण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा कारखाना व्यवस्थापनाने परिपत्रकाद्वारे केली आहे.
जकराया शुगर लिमिटेडचा गळीत हंगाम सुरू झालेला असून या हंगामात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी कारखान्याकडे द्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या दराची नोंद घ्यावी व कारखान्याला सहकार्य करावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ऊस दरावरून जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू असताना जकराया शुगरने जाहीर केलेला ३ हजार रुपयांचा दर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या निर्णयामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

