नागपूर: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या सर्वांना राज्य सरकारने तातडीची 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्या शुक्रवारपासून ही 10 हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले .विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली.
पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर केले आहेत. हे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचं वाटप केले तर अनेक आरोप होतात. पैशाचे वाटप बरोबर झाले नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचे नाही. त्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत. तशी व्यवस्था करणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल अहवाल देण्यास सांगितले आहे. हा अहवाल केंद्राला पाठवण्याचे आदेश दिले आहेत. आठ दिवसात अहवाल मिळावा या सूचना दिल्या आहेत. या पावसामुळे 4 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. हा प्राथमिक अंदाज आहे. नांदेडमध्ये 80 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तिथे एकाच दिवशी 166 मिलीमीटर पाऊस पडला. काही ठिकाणी तर 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनाच्या परिसरात 48 तासात 1072 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि 17 टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली. ढगफुटीपेक्षा हे भयानक आहे. निसर्गाचा बॅलन्स बिघडल्याची ही परिस्थिती आहे. म्हणून अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागेल. हा सर्व परिसर इको सेन्सिटीव्ह झोन समजून काम करण्याची गरज आहे. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबरोबर तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

