येस न्यूज नेटवर्क: राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय रद्द करून गाळप हंगाम उशिरा सुरू करावा, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांची भेट घेऊन निवेदन साद केले असून, १५ नोव्हेंबरपूर्वी कारखाने सुरू करू नयेत, अशी मागणी केली आहे.
१५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू केल्यास उसाचा साखर उतारा कमी राहण्याची शक्यता असून त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या उत्पन्नावर होऊ शकतो, असा दावा संघटनांनी केला आहे. त्यामुळे सरकारने ७ ऑक्टोबरपर्यंत ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास ८ ऑक्टोबर रोजी साखर आयुक्तालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी सह सात शेतकरी संघटनांनी दिला आहे.











