मुंबई : सोमवारी रात्रीपासून दिल्लीत असलेल्या राज ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपा नेते विनोद तावडे यांच्यासह राज ठाकरे आणि अमित ठाकरे अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. यावर मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकारणात सगळ्या गोष्टी अचानक होत असतात. अशी कुणकुण कुणालाच नसते. राज ठाकरे यांना निमंत्रण आल्यामुळे ते दिल्लीला गेले. काहीतरी विचार करून गेले आहेत. काहीतरी विचार करून समोरच्यांनी बोलावले आहे. जो काही निर्णय होईल, तो योग्य निर्णय होईल. कार्यकर्त्यांच्या भावना, लोकसभेचा लेखाजोखा हा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता, जे होणार आहे, ते चांगले होणार आहे, असा विश्वास मनसे सरचिटणीस हेमंत संभुस यांनी व्यक्त केला.