सोलापूर- टाइम्स ग्रुपतर्फे देण्यात येणारा ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार २०२४’ हा पुरस्कार सोलापुर मधील प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड कंपनीला देण्यात आला आहे. टाइम्स ग्रुपतर्फे मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर अवॉर्ड्स २०२४ साठी ‘एक्सलन्स इन इन्व्हायर्मेंटल सोशल गव्हर्नन्स’ म्हणजेच पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) श्रेणीमधून ह्या पुरस्काराची निवड करण्यात आली आहे.
टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचा घटक असलेल्या “द मशिनिस्ट” मॅगजीन तर्फे सुपर शॉपफ्लोर पुरस्कार देण्यात येतो. विशेषत: ५०० ते १९९९ कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या मध्यम स्तरावरील कंपन्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. हैद्राबाद येथे पार पडलेल्या “टेक इन मॅन्युफॅक्चरिंग समिट २०२४” या कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रिसिजन कंपनीने मागील वर्षात मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, उत्पादन प्रक्रियांमधील इनोव्हेशन, उत्पादन क्वालिटी, औद्योगिक पर्यावरण धोरण, औद्योगिक सुरक्षा धोरणास अनुसरून कंपनीच्या परिसरात केलेले काम व या धोरणांची केलेली अचूक अंमलबाजवणी तसेच सामाजिक उत्तरदायीत्वाच्या माध्यमातून शाश्वत विकाससाठी केलेल्या कामाचे कठोर मूल्यमापन केल्यानंतर या पुरस्कारासाठी प्रिसिजनची निवड करण्यात आली आहे.
प्रिसिजनने मागील ३० वर्षापासून सर्वोत्कृष्ट गुणवत्ता, कस्टमर फोकस कामातील अचूकपणा हीच आपली ओळख बनविली आहे. पॅसेंजर कारच्या कॅमशाफ्ट उत्पादनातील अग्रगण्य उत्पादन कंपनी म्हणून प्रिसिजनची जगात ओळख निर्माण झाली आहे. टाइम्स ग्रुपसारख्या जगविख्यात समुहाकडून हा पुरस्कार मिळणे हा फक्त प्रिसिजनचा नाही तर सोलापुरमधील कामगारांचा बहुमान आहे. दि.२७ जून रोजी हैद्राबाद येथे पार पडलेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रिसिजन कंपनीच्या वतीने कंपनीचे सेफ्टी मॅनेजर सुहास पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कंपनीचे चेअरमन यतिन शहा यांनी कंपनीमधील सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे अभिनंदन केले.
