निसर्ग संवर्धकांच्या सन्मानाने ‘प्रिसिजन’ ने दर्शविली सामाजिक कृतज्ञता
सोलापूर : प्रतिनिधीथं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच संस्थेच्या निसर्गवारी उपक्रमाला तसेच सर्पमित्र आणि वन्यजीव संवर्धक राजेश ठोंबरे यांच्या पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या अजोड कार्याला सन्मानित करून प्रिसिजन फाउंडेशनने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कृतज्ञतेचे दर्शन घडविले. १८ व्या वर्षीच्या प्रिसिजन गप्पांना शुक्रवारी हुतात्मा स्मृती मंदिरात आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला.
यावेळी पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावसकर, प्रशांत अवचट, राजेश ठोंबरे यांच्या झालेल्या प्रकट मुलाखतीतून त्यांच्या उत्तुंग समाजकार्याचा पट उलगडला.प्रिसिजनच्या परंपरेनुसार ठीक ६.२५ वाजताच हुतात्मा स्मृती मंदिरातील रंगमंचाचा पडदा उघडला गेला आणि सोलापूरकरांच्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात प्रिसिजन गप्पांचा मंच तीन दिवसीय गुजगोष्टींसाठी खुला झाला.प्रिसिजन गप्पांच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावसकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. यंदाचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार शिरूर (जि. पुणे) येथील थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच संस्थेच्या निसर्गवारी उपक्रमाला देण्यात आला. निसर्गवारी या प्रकल्पाचे प्रवर्तक प्रशांत अवचट यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तर यंदाचा स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार चाळीसगाव येथील सर्पमित्र आणि वन्यजीव संवर्धक राजेश ठोंबरे यांना देण्यात आला. दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरणप्रसंगी व्यासपीठावर प्रिसिजन कॅमशाफ्टचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक करण शहा उपस्थित होते.पुरस्कार वितरण समारंभानंतर पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावसकर, प्रशांत अवचट आणि राजेश ठोंबरे यांची प्रकट मुलाखत दत्ता जोशी (छत्रपती संभाजी नगर) यांनी घेतली. ही प्रकट मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली.पद्मश्री डॉ. हिम्मतराव बाविसकर यांनी विंचू दंशामुळे होणाऱ्या मृत्यूला रोखण्यासाठी केलेल्या संशोधनाबद्दल माहिती दिली. ज्या परिसरात विंचूदंश झाल्यानंतर रुग्णाला उलटी झाली तर दुसऱ्या दिवशी मृत्यू निश्चित असल्यामुळे कुटुंबीय जिवंतपणीच त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करायचे, त्या परिसरात मृत्युदर शून्यावर आल्याचा घटनाक्रम डॉ. बाविसकर यांनी सांगताच सोलापूरकरांनी प्रचंड टाळ्यांनी त्यांना दाद दिली.निसर्गवारीचे प्रवर्तक प्रशांत अवचट यांनी पंढरीच्या वारीमध्ये पळसाच्या पानापासून तयार केलेल्या एका पत्रावळीपासून सुरू झालेला पर्यावरण संवर्धनाचा प्रवास आठ कोटी पत्रावळीपर्यंत कसा झाला याची माहिती उपस्थितांना दिली. संतांनी सांगितलेला चराचर रक्षणाचा संदेश कृतीत आणण्याचा कार्यक्रम म्हणजे निसर्गवारी आहे, ही प्रशांत अवचट यांची भूमिका सोलापूरकरांना भावली.
तर सर्पदंशामुळे मृत्युपंथाला लागलेले आणि त्यातून परत आलेले निसर्ग संवर्धक राजेश ठोंबरे यांनी स्वतःच्या प्राणरक्षणापासून हजारो जणांच्या प्राणरक्षणापर्यंतचा प्रवास सोलापूरकरांच्या समोर उलगडला. कृतिशील प्रबोधन, प्रथमोपचार आणि उपचारांची सोय या त्रिसूत्रीवर काम केल्यानंतर आज देशभरात तब्बल ३० हजारांहून अधिक तरुणांची फळी उभी झाल्याचे ठोंबरे यांनी सांगितल्यानंतर सोलापूरकरांनी त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.प्रिसिजनचे मुख्य जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रिसिजन गप्पा कार्यक्रमास सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
प्रिसिजन गप्पांमध्ये आज प्रिसिजन गप्पांमध्ये शनिवारी प्रख्यात संगीत अभ्यासक आणि गायिका डॉ. मृदुला दाढे आणि सहकाऱ्यांचा ‘रहे ना रहे हम’ हा हिंदी संगीतकारांची गाणी आणि गप्पांचा कार्यक्रम होईल. कार्यक्रम ठीक सायंकाळी ६.२५ वाजता होणार असून रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले आहे.










