उद्या मध्यरात्रीपासून सोलापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा असा दमाणीनगरचा रेल्वे ब्रीज वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौकातून दमाणीनगर रेल्वे ब्रीज वरून ये-जा करणारी वाहतूक पूर्णपणे बंद होणार आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी याबाबत आदेश देखील काढले आहेत. अवंती नगर मार्गे जो सक्षम पर्याय आहे त्या 54 मीटर रस्त्याचे काम अर्धवट आहे. 6 डिसेंबर पासून या मार्गावरून वाहतूक सुरू करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. आता दहा डिसेंबर पासून वाहतूक सुरू होईल असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. सुचवलेले उर्वरित दोन पर्यायी मार्ग अरुंद तसेच अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. त्यामुळे उद्या मध्यरात्रीपासून म्हणजेच मंगळवार सकाळपासून सोलापूरकरांना अभूतपूर्व अशी वाहतुकीची कोंडी या परिसरात पाहायला मिळणार आहे. दमानी नगरचा रेल्वे ब्रिज 102 वर्ष जुना झाल्यामुळे झाल्यामुळे तो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 14 डिसेंबर रोजी पाडला जाणार आहे पुढील वर्षभर इथली वाहतूक बंदच राहणार आहे. सुमारे 35 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी सातशे मीटर लांब असा नवीन ब्रीज बांधला जाणार आहे. या दमानी नगरच्या रेल्वे ब्रिजवरून वाहतूक बंद करण्यासाठी आज आणि उद्याचा असे दोनच दिवस बाकी आहेत, तोपर्यंत पर्यायी मार्गांची महापालिका आयुक्त सचिन ओंबासे तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पाहणी करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्याची कार्यवाही केली तरच पर्यायी मार्ग मोकळे होतील अन्यथा सुमारे चार लाख लोकांना वाहतूक कोंडीचा खूप मोठा फटका बसणार आहे.

