जून महिना संपत आला तरी सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. पाण्याच्या साठ्यात झपाट्याने घट होत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा परिस्थितीत सोलापुरातील मुस्लिम समाजबांधवांनी अल्लाहकडे पावसासाठी प्रार्थना करत ‘सलातुल इस्तिस्का’ ही पावसासाठीची विशेष नमाज अदा केली.
सोलापूरातील रंगभवन येथील अहले हदिस ईदगाह येथे ‘सलातुल इस्तिस्का’ अर्थात पावसासाठीची विशेष नमाज अदा करण्यात आली. मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आले. नमाजनंतर उपस्थित सर्वांनी मनोभावे अल्लाहकडे पावसासाठी दुवा केली. यावेळी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. हात वर करून, भरून आलेल्या डोळ्यांनी आणि कंठ दाटून आलेल्या आवाजात अल्लाहकडे रहमत स्वरूपात पाऊस बरसविण्याची याचना करण्यात आली.
यावेळी मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी खुतबा सादर करत, देशात कुठेही दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पाऊस पडावा, जनावरांना चारा आणि पाणी मिळावे, तलाव, विहिरी आणि धरणे भरून निघावीत तसेच संपूर्ण सृष्टीवर अल्लाहची कृपा व्हावी, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी सोलापूर शहरातील मुस्लिम समाजबांधव मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.











