महापालिकेचा ‘स्मार्ट’ एल इ डी करार वादाच्या भोवऱ्यात; कराराची ‘स्थायी’ मध्ये होणार झाडाझडती

0
39

सांगली ( सुधीर गोखले) – मोठा गाजावाजा झालेला महापालिकेचा ‘स्मार्ट’ एल इ डी प्रकल्पाचा करार आता चौकशीच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकल्पास मुदतवाढी साठी स्थायी समिती ची सभा ३१ जुलै रोजी होत आहे पण हा करार प्रशासनाने केलाय तर मुदतवाढी साठी स्थायी समिती ची आवश्यकता का?  असा सवाल काही नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. ‘स्थायी’ च्या मागील झालेल्या सभेत ऐनवेळी हा विषय आल्याने यावर नगरसेवक संतोष पाटील यांनी आक्षेप घेत हा विषय विषयपत्रिकेवर घेऊन तो सभेमध्ये सादर करावा तसेच त्याच्यावर चर्चा घडवून आणावी अशा सूचना केल्या. त्यानुसार ‘स्थायी’ चे सभापती धीरज सूर्यवंशी यांनी तसे निर्देश प्रशासनाला दिले त्यानुसार आता ३१ जुलै च्या ‘स्थायी’ च्या सभेत मुदतवाढीचा विषय मांडला जाईल. 

स्मार्ट एल इ डी प्रकल्पाचा हा करार महापालिका प्रशासन आणि समुद्रा कंपनी यांच्या मध्ये झाला आहे त्याला एक वर्षही झाले आहे साधारण ३१ डिसेम्बर २०२२ रोजी हा करार संपुष्टात आला पण पुढे मुदतवाढ दिली गेली नाही. याआधी हा करार महासभा किंवा स्थायी समोर आलेला नाही आणि त्याचे मराठी भाषांतराची मागणी होऊनही हा करार भाषांतरित झाला नाही. त्यामुळे हा करार मुदत वाढीसाठी आता स्थायी समोर आल्याने अनेक सदस्यांच्या भुवया उंचावल्या आहेत तर तसे प्रश्न देखील उपस्थित केले जाऊ शकतात. करारामध्ये शासन निर्देशित असलेल्या १ ते ७ अटींच्या अमलबजावणी बाबतही प्रश्न सदस्यांकडून उपस्थित केले जाऊ शकतात. तर याआधीच आयुक्त सुनील पवार यांनी या कराराबाबत महत्वाचे विधान करत या करारात काही त्रुटी असल्याने त्याही दुरुस्त कराव्या लागतील असे  म्हणले होते.  या सर्व पार्श्वभूमीवर या ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या कराराची झाडाझडतीच ‘स्थायी’ समोर ३१ जुलै रोजी होणार हे निश्चित.