अन्नदात्या शेतकऱ्यांना फराळ देण्याचे भाग्य लाभल्याने आनंद – केतन वोरा
सोलापूर : गतवर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाले होते. तर यंदा दुष्काळाने त्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत अन्नदात्या शेतकऱ्यांना दिवाळीचा फराळ देण्याचे भाग्य लाभल्यामुळे आम्हाला आनंद झाला असल्याचे मत केतन वोरा यांनी व्यक्त केले.सनईचे मंगल सुर, कुटुंब सदस्याप्रमाणे आपुलकीने केलेले आदरातिथ्य आणि चिवडा, लाडू, शंकरपाळी, चकली असा दिवाळीचा मायेने दिलेला फराळ यांमुळे मोहोळ तालुक्यातील शिरापूर ,लांबोटी ,भांबेवाडी, मोरवंची या चार गावातील शेतकऱ्यासह ३८ संस्थामधील ५००० जणां च्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू खुलले. निमित्त होते केतन वोरा मित्रपरिवार आणि उद्योगवर्धिनी संस्थेतर्फे फराळ वाटप कार्यक्रमाचे.
दिवाळीनिमित्त सोमवारी जुना एम्प्लॉयमेंट चौकाजवळील उद्योगवर्धिनी संस्थेत हा फराळ वाटपाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर प. पू. मल्लीश्रीजी महासती, प. पू. विभवश्रीजी महासती, आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश पटेल, शारदादेवी आसावा, डॉ. नवनीत तोष्णीवाल, इंदरमल जैन, रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष मितेश पंचमीया, केतन वोरा, उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान आदी उपस्थित होते. फराळ वाटप कार्यक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष होते.
याप्रसंगी १० सामाजिक संस्था, १० पालावरच्या शाळा, ४ ग्रामीण वस्त्या, ११ शाळा, ४०७ दिव्यांग, ५०० वंचित व बेघर , शिरापूर, लांबोटी, मोरवंची, भांबेवाडी या चार गावासह जिल्ह्यातील इतर बैलजोडीधारक १०० शेतकरी अशा एकून ५ हजार जणांना दिवाळी फराळ देण्यात आला.
प. पू. मल्लीश्रीजी महासती म्हणाल्या, आपल्या उत्पन्नामधील काहीसा भाग समाजातील गरजूंना देणे ही भावना उदात्त आहे. आपण बी लावून त्याला पाणी दिल्यानंतर एक दिवस निश्चितपणे झाड मोठे होते आणि त्याचे फळ समाजाला मिळते. उत्पन्नातील पैसा व्यसनांवर खर्च करण्यापेक्षा आदर्शयुक्त जीवनाचा अंगीकार करावा, असेही प. पू. मल्लीश्रीजी महासती यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, केतन वोरा मित्रपरिवार आणि उद्योगवर्धिनी संस्थेतर्फे सलग ५ वर्षांपासून गरजूंना दिवाळी फराळ देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजातील गरजूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची तळमळ आणि समाजाप्रतीची कर्तव्य भावना अशा संस्थांच्या कार्यातून ठळकपणे अधोरेखित होते. उद्योगवर्धिनी संस्थेने हजारो महिन्यांना दिलेला रोजगार त्याचेच द्योतक आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले, समाज व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. ती जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. शहर आपले आहे या भावनेने प्रत्येकाने काम केले तर नक्कीच संपूर्ण समाजाची प्रगती होईल. सामाजिक उपक्रमांना सोलापूर महानगरपालिकेचे कायमच संपूर्ण सहकार्य असेल, असेही आयुक्त डॉ. सचिन ओंबासे याप्रसंगी म्हणाले.
उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सूत्रसंचालन तर केतन वोरा यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास नंदकुमार आसावा, डॉ. माधवी रायते, मोनिका कोठे, निलेश आसावा, मनीष रंभिया, कौस्तुभ करवा, शंभूसिंग चौहान, उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा राजोपाध्ये, स्मिता लाहोटी आदी उपस्थित होते.
दुष्काळातही बैलजोडी सांभाळणाऱ्या १०० शेतकऱ्यांनाही दिवाळी फराळ
यावेळी मोहोळ तालुक्यातील तालुक्यातील शिरापूर, भांबेवाडी, मोरवंची, लांबोटी व परिसरातील गावांमधील १०० शेतकऱ्यांनी यावर्षीच्या दुष्काळातही बैल बाजारात न विकता त्यांना मायेने,आपुलकीने सांभाळले. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून दुष्काळातही बैल सांभाळणाऱ्या अशा १०० शेतकऱ्यांनाही दिवाळी फराळ देण्यात आला.










