मंगल देशा..! पवित्र देशा..! महाराष्ट्र देशा…!
प्रणाम घ्यावा ..माझा हा ! श्री महाराष्ट्र देशा !
तुम्ही म्हणाल, आज महाराष्ट्र दिन नाही. मग महाराष्ट्राचे गुण- गाणं गाणारे हे गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत कशासाठी..? दररोज किती कोटीचे उद्योग गुजरातला पळवले यावरच आरोप प्रत्यारोप रंगतो. मात्र कितीही झाले तरी महाराष्ट्राने आपला क्रमांक एक कधीच सोडला नाही तो आज देखील कायम आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जीएसटी बाबत नुकतीच माहिती प्रसारित केली आहे. दिवाळी संपलेल्या गेल्याच ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत जीएसटी मधून केंद्र सरकारला तब्बल एक लाख 52 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणजे एक कोटी 68 लाख रुपये जीएसटी मधून मिळाले होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटी संकलनामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये तब्बल 23 कोटी रुपये जीएसटी भरून आपला क्रमांक एक कायम ठेवला आहे. गुजरातच्या जवळपास अडीच पट अधिक जीएसटी महाराष्ट्राने केंद्राला दिला आहे . महाराष्ट्राने 23 हजार सात कोटी, कर्नाटकने 10996 कोटी, तामिळनाडूने 9540 कोटी, गुजरातने 9469 कोटी तर उत्तर प्रदेशने 7839 कोटी रुपये जीएसटी संकलन केले आहे. उद्योग ,पर्यटन तसेच जीएसटी संकलनामध्ये देखील महाराष्ट्राने वरचा सततच वरचा क्रमांक राखला आहे. म्हणूनच पुन्हा म्हणावे वाटते; जरीपटक्या सह… भगव्या झेंड्याच्या एकचि देशा …
प्रणाम घ्यावा माझा हा…! श्री महाराष्ट्र देशा!!