सरासरीच्या केवळ ३९.२९ टक्के पाऊस; शेतीसमोर गंभीर संकट
सोलापूर : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाची अत्यंत असमान स्थिती पाहायला मिळत असून, उपलब्ध आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी अपेक्षित ४८१ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ १८९ मिमी पाऊस झाला असून, हे प्रमाण अवघे ३९.२९ टक्के आहे.
पावसाच्या टक्केवारीनुसार सोलापूरनंतर नंदुरबार जिल्ह्यात ३९.३९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. लातूरमध्ये ४३ टक्के, परभणीमध्ये ४७.३१ टक्के तर अमरावतीमध्ये ४८.१० टक्के पावसाची नोंद आहे.
सोलापूर हा आधीपासूनच अवर्षणप्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदाही पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके, ऊस तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांचे लक्ष आता सप्टेंबर महिन्यातील पावसाकडे लागले आहे. भारतात सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून ही परिस्थिती कृषी क्षेत्रासाठी चिंताजनक ठरू शकते











