स्वर्गिय जॉन येवलेकर राज्यस्तरीय उत्कृष्ठ निवेदक पुरस्काराचे सोमवारी वितरण विघ्नेश जोशी, मंजुषा गाडगीळ, शीला अडसूळे कांबळे यंदाचे मानकरी

0
64

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूरचे सुपुत्र हरहुन्नरी कलाकार आणि निवेदक स्वर्गिय जॉन येवलेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त जॉन येवलेकर राज्यस्तरीय उत्कृष्ठ निवेदक पुरस्कार यंदा मुंबईचे विघ्नेश जोशी, सोलापूरच्या मंजुषा गाडगीळ आणि शीला अडसूळे कांबळे यांना जाहिर करण्यात आला असून प्रसिध्द अभिनेते विजय गोखले यांच्या हस्ते सोमवार दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे. आयोजित कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती सर जॉन येवलेकर प्रतिष्ठान च्या सचिवा रूपश्री येवलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन १९६० मध्ये वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी जॉन येवलेकर यांनी आर्केष्ट्रा मध्ये आपली आवड दाखवून प्रवेश केला. उर्दू, हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेतून निवेदन करून प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप त्यांनी उमटवली. लक्ष्मी विष्णु मध्ये काम करत असताना जॉनी अॅन्ड हिज ऑर्केस्ट्रा या नावाने मोठ्याप्रमाणात कार्यक्रम केले. संपूर्ण महाराष्ट्रात तसेच कर्नाटकातील बेंगलूरू, म्हेसूर, बिहारच्या पाटणा, तामिळनाडूच्या चेन्नई अशा शहराबरोबर देशभरामध्ये त्यांनी सोलापूरचे टॅलेंट आपल्या निवेदनातून दाखवून दिले. कादर के किस्से, शुभराशी अंकराशी, लग्नावर बोलू काही असे अनेक विनोदी एकपात्री प्रयोग करून रसिकांच्या मनावर राज्य केले.

सर जॉन येवलेकर यांच्या निवेदन कौशल्यावर प्रभावित होवून अनेकांनी आपले करियर निवेदनातून सुरू केले. म्हणूनच अशा उत्कृष्ठ निवेदकांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचे सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानने ठरवले त्यानुसार मागील वर्षी अकबर शोलापुरी, शोभा बोल्ली, सुनिता पॉल आणि स्वप्नील रास्ते यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले यंदाचे हे पुरस्काराचे दुसरे वर्ष असून यंदाच्या वर्षी नाट्य, चित्रपट अभिनेता, लेखक आणि निवेदक विघ्नेश जोशी, निवेदिका मंजुषा गाडगीळ आणि निवेदिका शीला अडसुळे यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला असून ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते महाराष्ट्र रंगभूमी परिनिरीक्षण अध्यक्ष विजय गोखले यांच्या हस्ते सोमवार दि.

७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला दि फर्स्ट चर्च सोलापूरचे धर्मगुरू रेव्ह. विकास रणशिंगे, एच सी सी चर्च सोलापूरचे धर्मगुरू रेव्ह. इमॅनुएल म्हेत्रे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. असेही सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानच्या सचिवा रूपश्री येवलेकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जॉन येवलेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष फिलीप नदवी, उपाध्यक्ष शशिकुमार तेलंग, सहसचिव मंजुश्री येवलेकर, खजिनदार तेजश्री येवलेकर, सदस्य किरणकुमार इरनाळे, मायकल नदवी आदी उपस्थित होते.