येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयावर निशाणा साधला आहे. “असं केल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे”, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत. १४ मार्च रोजी MPSC ची पूर्व परीक्षा नियोजित असताना आज सकाळी अचाकन आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं. तसेच, त्या पुन्हा कधी घेतल्या जातील, याविषयी देखील काहीही स्पष्ट न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरल्याचं पाहायला मिळत आहे.
“MPSC च्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलल्यामुळे वर्षानुवर्ष त्यासाठी तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा”, असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.