कोल्हापुरात विधवा आईच्या पुनर्विवाहासाठी मुलानेच पुढाकार घेऊन आईचा पुनर्विवाह घडविला

0
20

कोल्हापूर : सामाजिक सुधारणेत आघाडीवर असलेल्या कोल्हापुरात तरुणाने आपल्या विधवा आईचा पुनर्विवाह घडविला. ४५ वर्षे वयाच्या आईची उर्वरित आयुष्यात पतीविना फरफट होऊ नये, या हेतूने मुलानेच पुढाकार घेऊन घडवून आणलेला हा विवाह सध्या कोल्हापुरात चर्चेत आहे. या पुनर्विवाहाने कोल्हापूरच्या सामाजिक सुधारणांमध्ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले.

  • युवराज नारायण शेले (वय २३) हा तरुण शिंगणापूर (ता. करवीर) येथील चंबुखडी परिसरात राहतो. त्याचे वडील सेंट्रिंग कामगार होते. गेल्यावर्षी त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर युवराजची आई रत्नाबाईच्या जगण्याचा सूरच हरवला होता. बारावी शिकलेला युवराज आईला दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला आईची चिंता वाटत होती. त्यातून आईच्या पुनर्विवाहाची कल्पना सुचली.
  • चंबुखडी परिसरातच राहणारे नात्यातील घटस्फोटीत मारुती व्हटकर यांना युवराजने पुनर्विवाहाबद्दल विचारणा केली. त्यांनी होकार दर्शविताच युवराजने आपल्या आईकडे पुनर्विवाहाचा आग्रह धरला. सुरुवातीला आईने युवराजचे म्हणणे धुडकावून लावले. लोक काय म्हणतील, असे म्हणत तिने एकाकी आयुष्य काढू, असे सांगितले. मात्र, अखेर मुलाचा आग्रह मान्य करीत ती पुनर्विवाहासाठी तयार झाली.
  • शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने गेल्यावर्षी विधवा प्रथा बंदीचा ठराव केला. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक गावांनी त्याचे अनुकरण करून विधवांना सन्मान देण्यास सुरुवात केली. आता युवराज शेले या तरुणाने विधवा आईच्या पुनर्विवाहाचे पाऊल उचलून कोल्हापूरचे पुरोगामित्व अधिक घट्ट केले. युवराजने पुढाकार घेऊन लग्नाची तयारी केली आणि चंबुखडी येथे १२ जानेवारीला लग्नाचा छोटेखानी समारंभ झाला. या लग्नाने रूढी- परंपरांची जळमटे हटवून समाजाला नवा संदेश दिला.