खरीप हंगाम पिक स्पर्धेचे आयोजन! पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

0
25

सोलापूर :- राज्यातील अधिकाअधिक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्मिती व्हावी तसेच शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादक्तेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

खरीप हंगाम 2023 मध्ये मूग, उडीद, बाजरी, मका, सोयाबीन, नाचणी(रागी), भात, ज्वारी, ज्वारी, भुईमुग, सुर्यफूल या पिकांचा स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतक-याकडे स्वताच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतक-यांकडे संबंधित पिकाखालील किमान 40 आर. (0.40 हेक्टर) सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील व आदिवासी गटातील स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरीता भाग घेण्यासाठी 300 रुपये प्रति शेतकरी प्रति पिक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाईल. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

पिक स्पर्धेसाठी जेवढे अर्ज प्राप्त होतील ते सर्व शेतकरी पिक स्पर्धेसाठी पात्र असतील. पिककापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्यांची तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे. एखाद्या पिकाचे क्षेत्र किमान 1000 हेक्टर असले पाहिजे ही अट काढुन टाकण्यात आली आहे.पीकस्पर्धा मध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतक-याला पुढील पाच वर्ष त्याच पिकाकरीता पीक स्पर्धेत भाग घेता येणार नाही. पिक स्पर्धेकरीता अर्ज करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क,7/12 व 8 अ चा उतारा जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पुर्तता करावी. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबंधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे राज्य व जिल्हास्तरावर बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत.

तालुका पातळीवरील सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस 5000 रुपये, दुसरे बक्षीस 3000 रुपये, तिसरे बक्षीस 2000 रुपये आहे. जिल्हा पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस 10,000 रुपये,दुसरे बक्षीस 7,000 रुपये तिसरे बक्षीस 5,000 रुपये आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस 50,000 रुपये, दुसरे बक्षीस 40,000 रुपये, तिसरे बक्षीस 30,000 रुपये आहे.

शेतकऱ्यांनी सदर पिक स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा. खरीप हंगामात उडीद व मुग पिकांसाठी स्पर्धेत अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 असून उर्वरित पिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.31 ऑगस्ट 2023 आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.