येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) भारत आणि इंग्लंडदरम्यान मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिलीय. भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे खेळाडूंनाही करोना संसर्गाचा धोका असल्याने कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या कसोटीसंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सविस्तर चर्चा करुन सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. दोन्हीकडील अधिकाऱ्यांमध्ये सामन्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर सामन्याला अगदी काही तास शिल्लक असताना केलेल्या चर्चेनंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो या भीतीने सामना रद्द करण्यात आलाय. यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांकडून क्रिकेट चाहते आणि सामन्याशी संबंधित इतर सहकाऱ्यांची माफीही मागण्यात आलीय. भारतीय संघामधील सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे असं ईसीबीने स्पष्ट केलंय.