आजच्या राजकीय परिस्थितीवर छावा चित्रपटाचा धडा तंतोतंत लागू होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी कोणावर टीका केली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मनुस्मृती मध्ये देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करण्यात आला. त्यामुळे मनुस्मृती मध्ये देण्यात आलेली माहिती औरंगजेब पर्यंत कोणी पोहोचवली? असा प्रश्न देखील केला.
काय म्हणाले रोहित पवार
सध्या छावा चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. तब्येतीत चांगली सुधारणा झाल्याने काल सहकुटुंब हा चित्रपट पाहिला. आधी स्वराज्यरक्षकसंभाजी मालिकेच्या माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे यांनी तर आता छावा चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता विकी कौशल याने आपल्या कसदार अभिनयाने छत्रपतीसंभाजीमहाराजांचं अफाट कर्तृत्त्व, उत्तुंग नेतृत्त्व, असीम त्याग, पराक्रम, वाघासारखं धैर्य आणि शौर्य हे सामान्य माणसांसमोर आणलं. याबद्दल या दोघांचेही मनापासून आभार! छावा चित्रपटाच्या माध्यमातून आभाळाएवढा आपला राजा पाहून जेवढा आनंद झाला तेवढंच दुःख त्यांना देण्यात आलेल्या यातना पाहून झालं. अनन्वितअत्याचार करुनही शंभूराजे आपल्या भूमिकेपासून तसूभरही हटले नाहीत किंबहुना मरण स्वीकारलं पण शरण गेले नाहीत. त्यांचा केलेला अनन्वित छळ आणि दिलेल्या मरणयातना म्हणजे मनुस्मृतीतील शिकवणुकीचा प्रयोग होता. मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा याबाबतची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोचवली, हेही पाहण्याची गरज आहे. या घटनेला कुठलंही एक कुटुंब नाही तर अनेकजण जबाबदार होते, पण ते तितक्या योग्य पद्धतीने समोर आणलं गेलं नाही. कदाचित भविष्यात ते अधिक स्पष्टपणे पुढं येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
लाचारी सोडून कसल्याही संकटाला भिडण्याची, लढण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा या चित्रपटातून मिळते. शिवाय शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो पण काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते याचाही धडा मिळतो आणि आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो.










