मराठा समाजाची मी माफी मागतो; तानाजी सावंत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

0
34

येस न्युज नेटवर्क : मराठा आरक्षणावरुन आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अखेर माफी मागितली आहे. “सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?”, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. मात्र जर माझ्या मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सबंध मराठा समाजाची माफी मागतो, असं म्हणत तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षण मिळालं त्यानुसार अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. मात्र महाविकास आघाडीचं सरकार असताना सहा महिन्यात आरक्षण रद्द करण्यात आलं. त्यावेळी रद्द झालेल्या आरक्षणावर कोणीही मोर्चा काढला नाही, आंदोलनाची भाषा केली नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांशी आमच्या चर्चा सुरु होत्या. आरक्षण मिळवण्यासाठी काय करायला हवं? याचा विचार करत होतो. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यावरच यांनी आंदोलनाची भाषा सुरु केली. यामागे कोणाचा हात आहे हे सगळ्यांना माहित आहे, असा आरोप देखील त्यांनी विरोधकांवर केला आहे.

“मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. मात्र आम्हाला टिकाऊ आरक्षण पाहिजे आहे. त्यामुळे आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. यासंदर्भात आमच्या बैठका सुरु आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्हाला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. सगळ्यांशी बोलून चर्चा करुन याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत,” असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.