सोलापूर – देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत स्फूर्तीचे प्रतीक ठरलेल्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आज सामूहिक गीतगायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, वित्त व लेखाधिकारी सीए. महादेव खराडे, तसेच परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले. सुरुवातीला सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन “वंदे मातरम”चे सामूहिक गायन केले. यावेळी देशभक्तीच्या भावनेने विद्यापीठ परिसर दुमदुमून गेला.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले, ‘वंदे मातरम’ हे केवळ गीत नसून, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणेचा अमर स्रोत आहे. यामुळे देशभक्ती, आत्मसन्मान आणि एकात्मतेची भावना दृढ होते. आजच्या पिढीने या गीतामागील इतिहास जाणून घेणे आणि त्यातील देशप्रेम जपणे अत्यंत आवश्यक आहे.





