पुणे: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना उमदेवारी देण्यात आली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला. त्याबाबतची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. येत्या 28 तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर केला जाईल असं अजित पवारांनी सांगितलं.
महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नेमक्या किती जागा मिळणार, याबाबत नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, शिरुर, रायगड आणि सातारा या मतदारसंघासाठी आग्रही आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार आहे.