शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी अनियमितता दिसून आल्याने महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी बीडचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना निलंबित केले आहे. या निलंबनाच्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून पवित्र अशा शिक्षण विभागातील लाचखोरी, आर्थिक देवाणघेवाण, नियमबाह्य कामे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहेत.
बोगस शालार्थ आयडी प्रकरणी महाराष्ट्र राज्याची अब्रूची लक्तरे देशाच्या वेशीवर टांगलेली असतानाच हा प्रकार घडला असून महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
बीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक विभागातील शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी प्राथमिक चौकशी केली असता वैयक्तिक मान्यता प्रकरणांच्या काही प्रकरणात अनियमितता असल्याचे दिसून आले आहे.
सदरचा अंतरिम चौकशी अहवाल समितीने शिक्षण आयुक्तांना पाठवल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन शिक्षणाधिकारी फुलारी यांना तात्काळ शासन सेवेतून निलंबित करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवांनी दिला.
तसेच सध्या जिल्हा परिषद लातूर येथे शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्त असणाऱ्या नागनाथ शिंदे यांनी देखील बीड येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना पदाचा दुरुपयोग केल्याचे दिसून आले. या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

