येस न्युज नेटवर्क : राज्यातील राजकीय पेच सुटण्याची काही चिन्हं दिसेनात. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या गटासह केलेल्या बंडामुळं शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि राज्यात सत्तासंघर्षाची ठिणगी पेटली असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. उद्या ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे संजय राऊतांना आदेश दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भातील कोणतीही नोटीस ईडीकडून अद्याप मिळालेली नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
अद्याप ईडीकडून नोटीस मिळालेली नाही : संजय राऊत
आपल्याला अजून ईडीकडून नोटीस मिळालेली नाही, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान उद्या संजय राऊत यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे ते उद्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता कमीच आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ते ईडीकडे मुदत मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे