सोलापूर विद्यापीठात ‘अभिजात मराठी अभिमान मराठी’ कार्यक्रम उत्साहात
सोलापूर – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असून, अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे, असे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांसाठी लढताना कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा नेत्याने स्वार्थासाठी आपला वापर करून घेऊ नये, तसेच सोशल मीडियावरील संवादातही भाषेची मर्यादा, संयम आणि संस्कार जपावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२६’ अंतर्गत आयोजित ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार ज्योती वाघमारे, आमदार सुभाष देशमुख, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कर्नल प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, मराठी भाषा विभागाच्या संचालक शामकांत देवरे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिवाकर कुलकर्णी, अधिष्ठता डॉ. महेश खरात, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकाडे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले की, महाराष्ट्राची संस्कृती संयम, आदर आणि संस्कारांची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करताना भाषेची सभ्यता आणि सामाजिक भान जपले पाहिजे. आज मोबाईल, गुगल आणि चॅट जीपीटीच्या युगात कोणत्याही माहितीची क्षणार्धात पडताळणी करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सत्य, वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह ज्ञान देणे ही शिक्षणव्यवस्थेची जबाबदारी असल्याचे सामंत यांनी नमूद केले.
एमपीएससी परीक्षांमध्ये पारदर्शकता राखणे आणि पेपरफुटी रोखणे याबाबत शासनाची भूमिका ठाम असल्याचे सामंत यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ११ तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही, याची तपासणी करण्याच्या सूचना कुलगुरूंना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी सक्ती करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.
सोलापुरात मोठा उद्योग आणण्याचे आश्वासन
सोलापूरच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग आणण्याची गरज असून, आचारसंहिता संपल्यानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करून याबाबत पुढाकार घेऊ, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यास सोलापूरच्या तरुणांचे पुणे, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
खासदार ज्योती वाघमारे यांनी सोलापुरातील तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवर मोठे उद्योग उभारण्याची गरज व्यक्त केली. उद्योगांच्या अभावामुळे शहराची लोकसंख्या घटत असून सोलापूर ‘वृद्धांचे शहर’ बनत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सोलापूर एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग सुरू करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
कुलगुरू डॉ महानवर म्हणाले की, विद्यापीठात सध्या १४६ कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू असून, १३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी हे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. विद्यापीठात मराठी भाषा तसेच वांग्मय संकुल सुरू आहे. त्यात आठ भाषेचे शिक्षण दिले जाते. जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार विद्यार्थी व शिक्षक ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेल्याची माहिती कुलगुरू प्रा. कर्नल प्रकाश महानवर यांनी दिली.
ग्रंथदिंडीने सप्ताहाचा प्रारंभ
‘अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२६’ अंतर्गत विद्यापीठाच्या अहिल्याभवन व नवीन प्रशासकीय इमारतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या सत्रात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचे पूजन कुलगुरू प्रा. कर्नल प्रकाश महानवर यांच्या हस्ते, तर ग्रंथपूजन प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. महेश खरात, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकाडे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले.
मराठी राज्य विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
मराठी भाषा सामाजिक समरसतेची वाहक
‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या विषयावरील विशेष व्याख्यानात सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून सामाजिक समरसता आणि सांस्कृतिक वारशाची वाहक असल्याचे सांगितले. सोलापूर शहरात विविध भाषा बोलल्या जात असून, भारतीय विचारांची विविधता हीच भारताच्या एकतेची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
संतपरंपरा ही लोकशाहीची खरी पायाभूत परंपरा असून, मराठी साहित्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. मराठी भाषा जिवंत आणि समृद्ध ठेवण्यात पत्रकारितेचा मोठा वाटा असल्याचे सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या मराठी भाषेच्या सेवेचाही त्यांनी उल्लेख केला. ग्रामीण तसेच दलित साहित्यामुळे मराठी साहित्यविश्व अधिक समृद्ध झाले असून, नव्या पिढीने मराठीतील समृद्ध शब्दसंपत्ती जपली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मैफल
‘अभिजात मराठी सन्मान’ कार्यक्रमात गायक अभिजीत कोसंबी आणि प्रसन्नजित कोसंबी यांच्या गायनाची मैफल तसेच विविध नृत्य सादरीकरण झाले. ‘माऊली माऊली’, ‘भेटला विठ्ठल माझा’ आणि ‘गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी’ आदी गीतांनी उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते दिगंबर नाईक यांनी केले. मराठी भाषेवरील प्रेम आणि योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित विमलताई माळी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या यशाचे मंत्री उदय सामंत यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे आणि श्रुती देवळे यांनी केले, तर आभार डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले.















