येस न्युज मराठी नेटवर्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले.
मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणार आहेत. आज मुंबई आणि पुणे परिसरात अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब यांच्या मुंबई ते पंढरपूर प्रवासासाठी रस्ते वाहतूक पावसाच्या परीस्थितीचा अंदाज घेऊनच मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रवास निश्चित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत आहेत त्यांच्या शेजारी पत्नी रश्मी ठाकरे बसल्या आहेत.
मुख्यमंत्र्यासोबत महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील कोलते दांपत्याला
आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) महापूजा करतील. केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापुजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल. महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचं फळ मिळालं आहे. 2000 मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावं, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी सांगितलं. 1972 पासून वारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.