भारत जोडो यात्रा काश्मीरात अन् दोन बॉम्बस्फोट; कॉंग्रेसचे अमित शहांना पत्र

0
16

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली आहे.
कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये सुरू झाली आहे. मात्र या यात्रेदरम्यान काश्मीरमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या यात्रेला आवश्यक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ही मागणी करण्यात आली असून या मागणीचे पत्रही त्यांना पाठवण्यात आले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली आहे. यात्रा जम्मू येथे असतानाच अवघ्या ७० किलोमीटर अंतरावर नरवाल भागात अवघ्या १५ मिनिटात दोन बॉम्बस्फोट घडविण्यात आले. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आणि भारत जोडो यात्रा काश्मीर मध्ये असताना, सुरक्षा व्यवस्था मजबूत असून देखील बॉम्बस्फोट होणे ही आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे. दहशतवादविरोधी घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे गांधी कुटुंबीय हे कायमच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर वर राहिले आहेत.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे दहशतवादाच्या भ्याड हल्ल्यात बळी पडले आहेत, हे आपण जाणताच. केंद्र सरकारने देखील राजकीय आकसापोटी राहुल गांधी यांची विशेष सुरक्षा व्यवस्था शिथिल केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा हि एकात्मता, बंधुता, आणि शांतीचे प्रतीक असून त्याला भारतीय जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यापार्श्वभूमीवर नरवाल इथे झालेल्या हल्ल्यामुळे मूलतत्त्ववादी घटक भारत जोडो यात्रेला लक्ष्य करतील अशी भीती आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे.
सबब २१ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस या पत्राद्वारे आपल्याला सादर विंनती करत आहे की आपण केंद्रीय गृहमंत्री या नात्याने वैयक्तिक पातळीवर राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेच्या सुरक्षेची तजवीज करावी. तसे निर्देश आपण संबंधित सुरक्षा व्यवस्थांना द्याल ही अपेक्षा.