सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे निधी मागणी प्रस्ताव तात्काळ सादर करावेत -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

0
10

सोलापूर दि.6 (जिमाका):- राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीला जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी सर्वसाधारण योजना 590 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी, आदिवासी क्षेत्र उपयोजना चार कोटी असे एकूण 745 कोटी निधी मंजूर झालेला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी त्यांना मंजूर असलेल्या निधीचे मागणी प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी नियोजन समितीला तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी समाधान टोम्पे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 च्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी प्रस्तावित केलेली कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी निधी मागणीचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत. नियोजन समितीकडून सदरील प्रस्तावना तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. माहे ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 मध्ये स्थानिक स्वराज्य निवडणूक होण्याची शक्यता असल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यास मंजूर कामे सुरू करता येणार नाहीत. तरी सर्व संबंधित विभागांनी आपल्या विभागाच्या कामांना नियोजन समितीकडून तात्काळ प्रशासकीय मान्यता घेऊन ती कामे आचारसंहितेपूर्वी सुरू करावीत. यावर्षी नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आलेला निधी माहे मार्च 2024 अखेर शंभर टक्के खर्च करणे अपेक्षित असून, निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

ज्या शासकीय यंत्रणांनी मागील वर्षी कामनिहाय प्रस्ताव मंजुर करून घेतलेले असेल व ते कामे पूर्ण झालेली असतील तर सर्व संबंधित यंत्रणांनी दायित्व निधी मागणीचे प्रस्ताव काम निहाय त्वरित नियोजन समितीला सादर करावेत. दायित्व निधी मागणी करताना एकूण सर्व कामांच्या निधीची मागणी करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी संबंधित यंत्रणा प्रमुखांना दिल्या.

मागील बैठकीतील अनुपालन अहवालानुसार सर्व संबंधित विभागानी माहिती द्यावी. तसेच दिनांक 7 सप्टेंबर रोजी माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समितीसमोर अनुपालनाची सुस्पष्ट माहिती द्यावी, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी सुचित केले.

प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी सर्वसाधारण योजना सन 2023-24 चे नवीन प्रस्ताव व शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या निधी या विषयी माहिती दिली तसेच सर्वसाधारण योजना सन 2022-23 अंतर्गत संबंधित यंत्रणाकडे दायित्व मागणीच्या प्रलंबित प्रस्तावाची माहिती सांगितली. तर समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी अनुसूचित जाती उपयोजनासाठी सन 2023-24 मध्ये 151 कोटीचा निधी मंजूर असून एकाही विभागाकडून निधी मागणीचे प्रस्ताव आलेले नाहीत अशी माहिती दिली.