अल कायदा या पाकिस्तान मधील दहशतवादी संघटनेशी जुबेर हंगेरकर यांचे कनेक्शन असल्याचे सिद्ध झाल्यामुळे पुण्यात एटीएस पथकाकडून त्याला अटक करण्यात आली. जुबेर हा आयटी इंजिनिअर असून तो मूळचा सोलापूरचा आहे. त्याचे सोलापूर कनेक्शन तसेच त्यांनी वळसंग आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठे- कुठे कशाच्या कार्यशाळा घेतल्या याची कसून तपासणी सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाशी जुबेर चा काही संबंध आहे का याचा देखील शोध एटीएस कडून सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. काही सिमीचे सदस्य सोलापुरात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशभर सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला असून त्याच अनुषंगाने सोलापूरचे पोलीस देखील दहशतवादी कार्यकर्त्यांचे तसेच त्यांचे नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

