सिंहगडावर मोठी दुर्घटना, सहलीला आलेल्या १२वीच्या विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू

0
14

येस न्युज मराठी नेटवर्क : मुळशी तालुक्यातून सहलीसाठी आलेल्या एका बारावीच्या विद्यार्थ्याचा हत्ती टाक्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शाहिद मुल्ला असे बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळशी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये बारावीमध्ये शिकत होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या विद्यार्थ्यांला बाहेर काढण्यात आले.

मुळशी येथील प्रियदर्शनी स्कूलचे बारावीचे साठ विद्यार्थी आणि चार शिक्षक सिंहगडावर सहलीसाठी आले होते. हत्ती टाके परिसरात असताना शाहिद मुल्ला या विद्यार्थ्याचा शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरला व तो थेट पाण्यामध्ये पडला. बाकीच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला बाहेर काढले. बाहेर काढले तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दरम्यान, आता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे